अहमदनगर | नगर सह्याद्री अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेला आणि नगरसह राज्यात टिकेचा विषय ठरलेल्या नगर- मनमाड रस्त्याच्या कामासाठी यंत्रणा सज्ज आ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेला आणि नगरसह राज्यात टिकेचा विषय ठरलेल्या नगर- मनमाड रस्त्याच्या कामासाठी यंत्रणा सज्ज आहे. कामासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे. ठेकेदारही कामासाठी सज्ज आहे. मात्र, पावसाळ्याची आडकाठी आली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर कोणत्याही क्षणी हे काम सुरू होईल आणि राज्यात आदर्श असा हा हायवे निर्माण होईल अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली.
नगर- मनमाड हा चौपदरी रस्ता! दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून त्याकडे पाहिले जाते. मात्र, एखाद्या खेड्यातील रस्त्यसारखी त्याची अवस्था झाली होती. प्रचंड खड्डे आणि त्यातून वाहन चालकांसह प्रवाशांना होणारा प्रचंड त्रास नित्याचाच झाला होता. सदरचे काम चांगल्या दर्जाचे झाले नव्हते. त्यामुळे नेते मंडळींसह प्रशासन देखील टीकेचे धनी झाले होते.
सदरचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. मात्र, हे काम करणार्या ठेकेदाराने ते काम थांबवले. संबंधीत ठेकेदाराकडे काही लोकप्रतिनिधींनी टक्केवारीची मागणी केल्याची चर्चा झडली. त्याच वेळी टक्केवारीची मागणी करणार्या दोन लोकप्रतिनिधींची नावे चर्चेत आली आणि सदरचे कामही ठप्प झाले. सदरचे काम करण्यास संबंधित ठेकेदाराने असमर्थता दर्शवल्यानंतर या कामासाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
सदरच्या कामासाठी आता भरीव निधी उपलब्ध झाला असून त्या कामासाठी आवश्यक असणारे साहित्य देखील येऊन पडले आहे. पावसाळा सुरूच राहिल्याने त्यात अडसर आला आहे. पाऊस थांबल्यानंतर आणि रस्त्यावरील पाण्याचा निचरा झाल्यानंतर हे काम आता कोणत्याही क्षणी सुरू होणार असल्याची माहिती खा. विखे पाटील यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली.
COMMENTS