प्रोफेसर कॉलनी चौक व्यापारी संकुलाबाबत महापालिकेची कार्यवाही अहमदनगर / नगर सह्याद्री - महापालिका मालकीच्या प्रोफेसर कॉलनी चौक व्यापारी संकु...
प्रोफेसर कॉलनी चौक व्यापारी संकुलाबाबत महापालिकेची कार्यवाही
अहमदनगर / नगर सह्याद्री -
महापालिका मालकीच्या प्रोफेसर कॉलनी चौक व्यापारी संकुलातील गाळेधारकांची याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता हे गाळे खाली करण्याच्या दिशेने महापालिकेच्या हालचाली सुरू आहेत. निकालाचा पूर्ण अभ्यास करून संबंधितांना गाळे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक समजते.
महापालिका मालकीचे प्रोफेसर कॉलनी चौकात व्यापारी संकुल आहे. हे संकुल आता जुने झाले आहे. ज्यावेळी संकुल झाले होते, त्यावेळी महापालिकेसोबत करार करून ज्यांनी भाड्याने हे गाळे घेतले होते, त्यापैकी अनेकांनी महापालिकेच्या परस्पर गाळ्यांची विक्री केली. काहींनी पोटभाडेकरू टाकले. ठराविक गाळेधारकच जुने आहेत. यापूर्वी अनेकदा हा पोटभाडेकरूचा विषय समोर आला होता. मात्र प्रत्येकवेळी राजकीय दडपण आल्याने प्रशासनाने येथे कारवाई करण्यास कच खाल्ली. काही वर्षांपूर्वी महापालिकेने इमारतीचे स्टक्चरल ऑडिट केले होते. त्यावेळीही ही इमारत कुचकामी झाल्याचा अहवाल आला. या सर्व बाबी लक्षात घेऊन येथील व्यापारी संकुल पाडून तेथे प्रशस्त व्यापारी संकुल बांधण्यात यावे, असा विचार समोर आला. केवळ विचारच समोर आला नव्हे तर अचानक यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली.
या सर्व प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप मोठा असल्याने ही प्रक्रियाच संशयाच्या भोवर्यात सापडली होती. गाळे खाली करण्याच्या महापालिकेने नोटिसा दिल्यानंतर प्रशासन विरोधात गाळेधारक आणि त्यांचे समर्थक असे रूप आले. हे प्रकरण न्यायायलायत गेले. आता न्यायालयानेच बहुतांश गाळेधारकांचे म्हणणे फेटाळले असल्याने महापालिकेचा या गाळेधारकांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाडेकरू, पोटभाडेकरू यांनी महापालिके विरोधात अहमदनगर जिल्हा न्यायालयात व्यापारी संकुल पाडू नये म्हणून याचिका दाखल केल्या होत्या. याची सुनावणी अनेक दिवसांपासून सुरू होती. जिल्हा न्यायालयाने महापालिका विरोधात दाखल ३५ याचिका फेटाळल्या आहेत. ८ प्रकरणी सुनावणी सुरू आहे, मात्र यासाठी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यास महापालिकेला मोकळीक मिळाली असल्याची माहिती महापालिकेचे वकील ऍड. प्रसन्ना जोशी यांनी दिली.
न्यायालयाच्या या निकालानंतर महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. मात्र हालचाली करताना त्या गोपनीय ठेवण्यात येत आहेत. गाळेधारक उच्च न्यायालयात जाणार का, गेल्यास तेथे निकालाला स्थगिती मिळेल का, उच्च न्यायालयात कसे सामोरे जायचे, याचा विचार महापालिका करत आहे. तसेच एकीकडे ही तयारी करत असतानाच दुसरीकडे जिल्हा न्यायालयाच्या निकालानुसार गाळेधारकांना नोटिसा देण्याचीही तयारी सुरू असल्याचे खात्रीलायक समजते. पोटभाडेकरू कोण आहेत, याची माहिती महापालिकेकडे इत्यंभूत आहे. त्यांना नोटिसा देऊन गाळे खाली करण्याचे सांगण्यात येणार आहे. तसेच ज्या आठ गाळेधारकांच्या याचिकावर सुनावणी होणार आहे, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना संकुल सोडण्याबाबत सांगण्यात येणार असल्याचे समजते.
महापालिकेला मोठी संधी
सध्याच्या व्यापारी संकुलाची जागा मोठी आहे. शिवाय संकुलामागेही महापालिकेची मोठी जागा आहे. प्रोफेसर कॉलनी चौक व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचे ठिकाण आहे. या दोन्ही जागा मिळून महापालिकेने बहुमजली संकुल उभारल्यास महापालिकेला मोठे उत्पन्न मिळू शकेल.
नेहरू मार्केट व्हायला नको
चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटची इमारत काही वर्षांपूर्वी पाडून तेथे मोठे संकुल उभारण्याचे नियोजन होते. मात्र अद्याप तेथे काहीही झालेले नाही. तशीच अवस्था प्रोफेसर कॉलनी संकुलाची होऊ नये. त्यामुळे येथे बांधकामासाठी लागणारा पैसा उभारून, त्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते करूनच गाळे पाडण्याची प्रक्रिया हाती घेण्याची गरज आहे.
‘बीओटी‘ अपयशीच ठरणार!
या व्यापारी संकुलाच्या जागेवर बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर नवीन संकुल उभारण्याचा पर्याय महापालिकेसमोर आहे. मात्र हा पर्याय कितपत यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता आहे. मोक्याच्या ठिकाणी जागा असल्याने राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यताच अधिक आहे. यापूर्वीही विकसकाला त्रास देण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे येथेही यापेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यता नसल्याने ‘बीओटी’चा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याबाबत साशंकताच आहे.
COMMENTS