अहमदनगर । नगर सह्याद्री 50 लाख रूपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाची आठ लाख 60 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार स...
अहमदनगर । नगर सह्याद्री
50 लाख रूपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाची आठ लाख 60 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक शंंकर चांदणे (वय 51, रा. बिशब कॉलनी, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसद म्युच्युअल निधी लिमिटेड (भिस्तबाग, सावेडी) कंपनीचा व्यवस्थापक ज्ञानेश्वर धोंडिबा बर्वे, कंपनीचा संचालक चाँदभाई ख्वाजा हुसेन शेख व त्याची पत्नी शबाना चाँदभाई शेख आणि दलाल मकरंद बोरूडे (रा. माणिकनगर, बुरूडगाव रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अशोक चांदणे यांचा अशोका कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम व विकासाचा व्यावसाय आहे. त्यांना बांधकाम कर्ज आवश्यक होते. मकरंद बोरूडे याने 50 लाख रूपयांचे बांधकाम कर्ज प्राप्त करून देण्याचे आमिष दाखविले. बोरूडे याने चांदणे यांची बर्वे, शेख दाम्पत्य यांच्यासोबत ओळख करून दिली होती. त्यांनी चांदणे यांना स्टेप अॅप सेल्फ कंट्रक्शन लोन या श्रेणीचे कर्ज स्कीमबाबत माहिती दिली. या स्कीमप्रमाणे 20 टक्के सेल्फ सिक्युरिटी डिपॉझिट अदा केल्यास त्वरीत कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखविले.
चांदणे यांनी 50 लाख रूपये कर्ज मंजुरीसाठी नऊ लाख 50 हजार रूपये सेल्फ सिक्युरिटी डिपॉझिट दिले. यातील पाच लाख 50 हजार रूपये 23 जुलै 2021 रोजी चेकद्वारे व चार लाख रूपये 20 ऑगस्ट 2021 रोजी आरटीजीएसद्वारे मसद म्युच्युअल निधी लिमिटेड या कंपनीच्या खात्यावर वर्ग केले होते. चांदणे यांना कर्ज अदा न केल्याने त्यांनी वेळोवेळी सेल्फ सिक्युरिटी डिपॉझिट ठेवलेल्या नऊ लाख 60 हजार रूपयांची मागणी केली. त्यांना वरील व्यक्तींनी 90 हजार रूपये परत दिले. मात्र अद्यापही आठ लाख 60 हजार रूपये न दिल्याने चांदणे यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
COMMENTS