गट-गणांची रचना जाहीर होताच इच्छुक लागले कामाला सुनील चोभे । नगर सह्याद्री गेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुक्यातील राजकारण नेहमीच माजी राज्य...
गट-गणांची रचना जाहीर होताच इच्छुक लागले कामाला
सुनील चोभे । नगर सह्याद्री
गेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुक्यातील राजकारण नेहमीच माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले विरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडी असे राहिले आहे. परंतु, आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार नीलेश लंके फॅक्टरची धूम पहावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद गट-गणांचा प्रारुप आराखडा जाहीर होताच मातब्बर नेत्यांसह इच्छुकांच्या गाववार्या सुसाट सुटल्या आहेत.
पंधरा वर्षापूर्वी नगर तालुक्यात माजी रात्र्यमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर तालुका महाविकास आघाडी तयारी केली. गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कर्डिले यांना रोखण्यात नगर तालुका महाविकास आघाडीला यश आले. जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी एकाही जागेवर त्यांनी कर्डिले यांना यश मिळू दिले नाही. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नगर तालुका महाविकास आघाडीला रोखण्यासाठी कर्डिले सेना सज्ज झाली आहे. भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे निवडणूक आणखीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. तसेच नगर तालुक्यातील देहरे, दरेवाडी, वाळकी, नवनागापूर या गटात आ. लंके यांचा दबदबा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लंके फॅक्टरची धूम दिसणार आहे. देहरे गटात देहरे, नांदगाव, शिंगवे, पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा, पिंप्री घुमट, निमगाव वाघा, हमीदपूर, जखणगाव, हिंगणगाव, खातगाव टाकळी, हिवरेबाजार, टाकळी खातगाव, विळद, निमगाव घाणा, कर्जुनेखारे. तर दरेवाडी गटात दरेवाडी, दहिगाव, पारगाव मौला, वाळुंज, बाबुर्डी घुमट, वाकोडी, अरणगाव, खंडाळा, सोनेवाडी (चास), चास, बुरुडगाव, वाटेफळ, खडकी. नवनागापूर गटात नवनागापूर, वडगाव गुप्ता, इसळक, निंबळक, नेप्ती, पिंपळगाव वाघा, भोयरे खुर्द, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी. वाळकी गटात वाळकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, घोसपुरी, अकोळनेर, हिवरेझरे. गुंडेगाव गटात देवऊळगावसिद्धी, राळेगण, वडगाव तांदळी, तांदळी वडगाव, रुईछत्तीशी, गुणवडी, आंबीलवाडी, मठपिंप्री, हातवळण या गावांचा समावेश आहे. यातील बहुतांशी गावे आ. लंके यांच्या मतदारसंघातील आहेत.
आमदार नीलेश लंके-नगर तालुका महाविकास आघाडीचे सुत जुळणार?
गेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा नेते शिवार्जी कर्डिले विरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडी असा राजकीय मुकाबला पहावयास मिळाला आहे. होवू घातलेल्या निवडणुकीतही असेच चित्र राहणार आहे. परंतु, पारनेर-नगर मतदारसंघातील चार गटात आमदार नीलेश लंके यांचा दबदबा आहे. पारनेर बरोबरच आता नगर तालुक्यात लंके फॅक्टरची धूक सुरु झाली आहे. नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व आमदार लंके यांचे गुरुशिष्याचे नाते आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार लंके नगर तालुका महाविकास आघाडीसोबत जुळवून घेतात की कसे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नगर तालुक्यातील मातब्बरांना आमदार नीलेश लंके डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवार दि. 2 जून रोजी गट-गणांचा प्रारुप आराखडा जाहीर झाला. तोडफोडीच्या गटगण रचनेमुळे कही खुशी कही गम अशीच परिस्थिती आहे. असे असले तरी हरकती नंतर 27 जूनला अंतिम गट रचना जाहीर होणार आहे.
आमदार लंके यांचा शब्द महत्वाचा...
पारनेर-नगर मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्यातील गावांमध्ये आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी वाढविली आहे. तसेच नगर तालुक्यात आपल्या हक्काचे कार्यकर्ते तयार केले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आ. लंके यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील चार गट-गणांत ते कोणाला शब्द देतात आणि कोणाला रिंगणात उतरवतात हे पाहणे महत्वाचे आहे.
चार गटात आ. लंके यांचा दबदबा
नगर तालुक्यातील 47 गावे पारनेर-नगर मतदारसंघात आहेत. याच 47 गावांनी विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य दिलेले असून ही गावे जिल्हा परिषदेच्या देहरे, नवनागापूर, दरेवाडी, वाळकी गटात विभागली गेली आहेत. आमदार निधीच्या माध्यमातून 47 गावांमध्ये आ. लंके यांनी मोठी विकासकामे केली आहेत. त्यातूनच नगर तालुक्यात आ. लंके यांचा स्वतंत्र गट निर्माण झाला आहे.
नगर तालुक्याची प्रारुप गटरचना बदलणार?
नगर तालुक्यातील नव्या प्रारुप गटरचनेत नगरपालिका झालेल्या नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी या तीन गावांचा समावेश झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या गांवाचा समावेश नव्या रचनेत झाला असून जोपर्यंत आयोगाचे स्पष्ट निर्देश येत नाहीत तोपर्यंत गट रचना जैसे थे राहणार आहे. मात्र हरकतीनंतर नागरदेवळेसह तीन गावे गटरचनेतून बदलण्यात येतील असे महसूल विभागातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गट-गणांच्या काठावरच्या गावांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
COMMENTS