आशिर्वादाच्या सुरक्षाकवचमुळे सुखरूप असल्याचे आ. जगताप यांची प्रतिक्रिया अहमदनगर । नगर सह्याद्री नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यां...
आशिर्वादाच्या सुरक्षाकवचमुळे सुखरूप असल्याचे आ. जगताप यांची प्रतिक्रिया
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला मंगळवारी पहाटे मुंबई नजिक एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला. यामध्ये आ. जगताप ज्या वाहनात होते, त्या बीएमडब्ल्यू या वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी वाहनातील सर्वजण सुखरूप आहेत.
आ. जगताप मुंबई येथे जात होते. एक्सप्रेस हायवेवर असताना हा अपघात झाला. या रस्त्यावर काम सुरू असल्याने त्या ठिकाणी डायव्हर्शन आहे. आ. जगताप यांच्या वाहनाच्या पुढे एसटी होती. एसटी चालकाला डायव्हर्शनचा अंदाज आला नसावा. त्यांनी अचानक एसटी वळविल्याने आ. जगताप ज्या वाहनात होते, ते वाहन एसटीला मागून धडकले. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र वाहनात असलेले आ. जगताप यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक अनुप काळे, अनिकेत थोरात व चालक सलीम हे सर्व सुखरूप असून, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
काही वेळेनंतर आ. जगताप व त्यांच्यासोबत असलेले मुंबईकडे रवाना झाले. मात्र ही माहिती नगरमध्ये समजल्यानंतर आ. जगताप यांच्याशी अनेकांनी संपर्क करून विचारपूस केली. या संदर्भात आ. जगताप यांना विचारले असता, त्यांनी आम्ही सर्व सुखरूप असल्याचे व मी कामानिमित्त मंत्रालयात असल्याचे सांगितले. एसटी चालकाला डायव्हर्शनचा अंदाज न आल्याने अचानक एसटीने वळण घेतले. त्यामुळे मागून आमच्या वाहनाची धडक एसटीला बसली. यात आमच्या वाहनाचे नुकसान मोठे झाले असले तरी नगरकरांच्या व आई-वडिलांच्या आशिर्वादाचे सुरक्षाकवच असल्याने मी व माझ्यासोबत असलेले सर्व सुखरूप आहोत, असे ते ‘नगर सह्याद्री’सोबत बोलताना म्हणाले.
COMMENTS