निघोज / पारनेर पारनेर/निघोज - पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके व आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भे...
निघोज / पारनेर
पारनेर/निघोज - पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके व आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन १० मार्चला सोडावे, अशी मागणी केली. याबाबत मंत्री पाटील यांनी कालवा सल्लागार समितीतील सर्वांशी चर्चा करून १७ मार्चला आवर्तन सोडण्याचे मान्य केले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार बनराव पाचपुते, आमदार अतुल बेनके, घनश्याम शेलार, सुदाम पवार यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून २५ मार्चला सुटणारे आवर्तन १७ मार्च रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कुकडीतून मिळणारे आवर्तन उशिरा असल्याने त्याचा फायदा शेतकर्यांना होत नाही. त्यामुळे हे आवर्तन आठ दिवस अगोदर द्यावे, अशी मागणी निघोज व लाभधारक शेतकरी शिष्टमंडळाने आमदार लंके यांच्याकडे केली होती. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटून शेतकर्यांची कैफियत मांडली होती. त्यानुसार कुकडीचे आवर्तन २५ ऐवजी १७ मार्चला सुटणार असल्याची माहिती आमदार लंके यांनी दिली आहे.
मुंबई येथील बैठकीस आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार उपस्थित होते. दरम्यान, आवर्तनची तारीख जाहीर झाल्यानंतर कुकडी पट्ट्यातील शेतकर्यांनी आमदार लंके यांची भेट घेउन आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली होती. लंके यांनी त्याची दखल घेत सोमवारी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी मंगळवारी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करून २५ ऐवजी १७ मार्चला आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुकडी कालव्याचे आवर्तन २५ मार्च रोजी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याविरोधात पारनेर तालुक्यातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर आमदार लंके यांनी पुढाकार घेत केलेली शिष्टाई सफल झाली आहे. मंत्री पाटील यांनी दुरध्वनीद्वारे कालवा सल्लागार समितीचे सदस्य गृहमंत्री दिलीप वळसे, घनश्याम शेलार, आ. अतुल बेनके, आ. बबनराव पाचपुते, आ. सुदामराव पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. आमदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांच्या जिव्हाळयाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल तालुक्यातील शेतकर्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS