पाच जणांना केली अटक । नगर तालुका पोलिसांची कारवाई अहमदनगर । नगर सह्याद्री नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात अक्षय कर्डिले याच्या सुरू अ...
पाच जणांना केली अटक । नगर तालुका पोलिसांची कारवाई
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात अक्षय कर्डिले याच्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पाच जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार जब्बाद रहिमखो पठाण यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अक्षय अनिल कर्डिले (वय 25), सौरभ अनिल कर्डिले (वय 21), संदीप पंडित जाधव (वय 23, सर्व रा. खंडाळा, ता.जि. अहमदनगर), विकी मनोहरलाल शर्मा (वय 29, रा. आझादनगर, ता.जि. अहमदनगर) आणि गणेश मनोहर लाड (वय 21, रा. वाळकी, ता.जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे. आरोपी अक्षय कर्डिले याच्या मालकीचे हॉटेल राजयोग असून त्याठिकाणी आरोपी कुंटणखाना चालवत होते.
मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नगर तालुका पोलिसांनी खंडाळा गावच्या शिवारातील हॉटेल राजयोग येथे छापा टाकला. आरोपी हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता महिला व मुलींना देह विक्री करण्यासाठी बोलवून घेत. त्या महिला व मुलींकडून गैरमार्गाने देहविक्री करून कुंटणखाना चालवत होते. पोलिसांनी देहविक्री करणार्या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे व पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक जारवाल व नगर तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
COMMENTS