अहमदनगर । नगर सहयाद्री
बंदी असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस वाहतुक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेऊर शिवारात सापळा रचत जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ६०० किलो वजनाचे गोमास तसेच बारा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून ६ गोवंशीय जातीच्या जनवरानी सुटका करण्यात आली आहे. सलमान अजीज शेख ( वय २८ वर्षे, रा. घासगल्ली, कोठला मैदान, अहमदनगर) आवाईज सलाम कुरेशी (वय २० वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, जेऊर, ता. नगर) अशी त्यांची नावे आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि तुषार धाकराव, अंमलदार संदीप पवार, सचिन अडबल, संतोष लोढे, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर यांच्या पथकला गोमास वाहतुक व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन रवाना केले.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार व एका पिकअप मधुन तालुक्यातील जेऊर येथुन संभाजीनगर कडे गोवंशीय जातीचे गोमांस व जिवंत जनावरे घेवुन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने जेऊर गांवातील चौकामध्ये सापळा रचत दोन जणांना गजाआड केले. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ६०० किलो वजनाचे गोमास, १ लाख २० हजार रुपये किंमतीची ६ मोठी गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे, ५ लाख रुपये किंमतीचा १ पिकअप, ४ लाख रुपये किंमतीची १ स्विफ्टकार असा एकुण १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.