नगर। नगर सहयाद्री
घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्यात यावा व सर्वसाधारण मालमत्ता करांमध्ये जून पर्यंत १० टक्के सूट मिळावी, या मागणीचे निवेदन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना देऊन चर्चा केली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, संजय आव्हाड, पप्पू भाले, विशाल वालकर, प्रशांत पाटील, सुरेश क्षीरसागर आदि उपस्थित होते.
मनपाने चालु वर्षाच्या घरपट्टी बीलांमध्ये अवाजवी वाढीव घनकचरा व्यवस्थापन कर दुपटीने वाढविण्यात आला असून, निवासी वापरासाठी पूर्वी २४० रु. होता तो आता ४८० करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिकांसाठी हा कर पूर्वी १२०० रु. होता तो आता २४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढीव कर आकारणी सर्वसामान्य, व्यापारी व दुकानदार यांना न परवडणारी व अन्यायकारक आहे. ती त्वरीत रद्द करावी व पुर्वीप्रमाणे कर आकारणी करावी.
शहरातील छोटे दुकानदार व मोठे व्यापारी यांना घनकचरा व्यवस्थापन कर सरसकट एकसारखा आकारण्यात आल्यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच कमी जागेत रहात असलेल्या रहिवासी व मोठ्या जागेत रहात असलेले रहिवासी यांना सुद्धा सरसकट एकसारखा कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनतेत चिड निर्माण झाली आहे.
यावर्षी एप्रिल व मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका तसेच कडकडीत उन्हाळ तसेच जून महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना शैक्षणिक खर्चाची वैयक्तिक तरतुद करावी लागत असल्याने सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये १० टक्के सूट देण्यात यावी व वाढीव घनकचरा कर रद्द करण्यात यावा, अन्यथा नागरिकांसमवेत जनआंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी विविध विषयावर चर्चा केली.